Gold Rate Today | आज सोनं-चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आठवड्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनं-चांदीच्या दरात एवढी मोठी घसरण झाली आहे की बाजारात अक्षरशः आनंदाचं वातावरण दिसत आहे. अनेक दिवसांपासून भाव चढउतार पाहत बसलेल्या सामान्य ग्राहकांसाठी आजची सकाळ ‘सुवर्णसंधी’ घेऊन आली आहे.
गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेटच्या सोन्याचा दर एकदम १,७४० रुपयांनी कोसळला आहे. म्हणजे आज एक तोळा २४ कॅरेट सोनं खरेदीसाठी तुम्हाला फक्त १,२३,६६० रुपये मोजावे लागणार आहेत. कालचा आणि आजचा फरक बघितला तर थेट खिशात बचत! २४ कॅरेटच्या १० तोळ्यांमध्ये तर तब्बल १७,४०० रुपयांची घसरण झाली असून आजच्या दिवशी त्यासाठी १२,३६,६०० रुपये खर्च करावे लागतील. सलग दुसऱ्यांदा सोन्याचा भाव खाली येत असल्याने ग्राहकांची पावलं थेट सराफाच्या दुकानाकडे वळताना दिसत आहेत.
२२ कॅरेट सोन्याचाही बाजार आज शांत बसलेला नाही. २२ कॅरेटच्या दरातही मोठी घसरण नोंदली गेली आहे. आज एक तोळा २२ कॅरेट सोनं 1,13,350 रुपयांना मिळत असून कालपेक्षा एकदम १,६०० रुपयांची घट झाली आहे. १० तोळ्यांमध्ये तर 16,000 रुपयांची घसरण! काल हेच सोनं ११,४९,५०० रुपयांना विकले जात होते. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबं सण-वार, मुंज, लग्नासाठी सोनं बघत असतात त्यांच्यासाठी आजचा दिवस म्हणजे मनासारखी किंमत मिळण्याचा मोठा योग.
१८ कॅरेट सोनं खरेदी करणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फायदेशीरच आहे. कारण, आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात १,३१० रुपयांची घसरण झाली आहे. आज एक तोळा १८ कॅरेट सोनं ९२,७४० रुपयांना मिळत आहे. १० तोळ्यांच्या खरेदीत थेट १३,१०० रुपयांची बचत. म्हणजे लग्नात जड सोन्याऐवजी हलकी, आधुनिक डिझाईन्स घेण्याचा प्लॅन करत असाल तर खिशावरचा ताण आज निम्मा वाटतो आहे.
फक्त सोनं नाही तर चांदीनेही आज बाजारात मोठी उडी खाली घेतली आहे. एक ग्रॅम चांदी ५ रुपयांनी स्वस्त झाली असून आता फक्त १६२ रुपये मोजावे लागतील. तर १ किलो चांदीचा दर थेट ५,००० रुपयांनी घसरून १,६२,००० रुपये झाला आहे. त्यामुळे सोन्यासोबतच चांदी खरेदी करणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच परवडणारा ठरतो आहे.
बाजारात दरदिवशी बदलत जाणारे भाव, डॉलरचे चढउतार, जागतिक राजकीय परिस्थिती या सगळ्याचा परिणाम थेट सोन्या-चांदीच्या भावांवर दिसत असतो. पण ग्राहकांसाठी महत्त्वाचं म्हणजे ‘योग्य दिवस’ ओळखून खरेदी करणे आणि आजचा दिवस तसाच आहे कमी भावात जास्त फायदा!
