Rain Updates: राज्यात सध्या हवामानाने अक्षरशः लपंडाव सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना आता अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. सकाळी ऊन आणि दुपारनंतर अचानक ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि गारपिटीसह पाऊस अशी परिस्थिती अनेक जिल्ह्यांत पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकरी वर्ग पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे.
भारतीय हवामान विभागाने आजही राज्यासाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी गारपिटीचाही अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
काल अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली. परभणी, अमरावती, हिंगोली, यवतमाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांच्या सरींनी पिकांना मोठा फटका बसला. धाराशिव जिल्ह्यात तर सलग चार दिवसांपासून अवकाळी पावसाचा तडाखा सुरू आहे. बामणेवाडी आणि केशेगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीमुळे ज्वारी आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सोलापूर जिल्हाही या अवकाळीच्या फेऱ्यातून सुटलेला नाही. शहरातील होडगी रोड, लष्कर, सात रस्ता या भागांत गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर अचानक कोसळलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. ग्रामीण भागात शेतरस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. एका बाजूला गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत आहे, तर दुसऱ्या बाजूला बाजारात कांद्याचे दर घसरल्याने आर्थिक फटका बसत आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मुंबईसह किनारपट्टी भागात वेगळीच स्थिती आहे. सकाळी ढगाळ वातावरण असले तरी दुपारनंतर उकाडा आणि दमट हवामान नागरिकांना त्रास देत आहे. पुढील दोन दिवस शहरात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Rain Updates
सध्या राज्यातील हवामानात मोठा अस्थिरपणा दिसून येत आहे. एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला वादळी पाऊस आणि गारपीट या दुहेरी परिस्थितीमुळे शेती आणि जनजीवन दोन्हीवर परिणाम होत आहे. पुढील काही दिवस तरी हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
या अवकाळीच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवीन आव्हान उभं राहिलं आहे. आकाशाकडे पाहत आशेने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस दिलासा नसून आणखी एक परीक्षा ठरत आहे.
