Weather Alert : देशभरात एप्रिलच्या मध्यातच उन्हाचा पारा अक्षरशः तळपताना दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच कडक ऊन आणि दुपारी अंगाची लाही लाही करणारी उष्णता यामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. मात्र या तीव्र उष्णतेदरम्यान वातावरणात अचानक बदल होत असल्याचंही चित्र दिसत आहे. काही भागात ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी गार वाऱ्यामुळे लोकांना थोडासा दिलासा मिळतोय.
दरम्यान, हवामान अंदाज देणाऱ्या स्कायमेट हवामान ने पुढील 48 तासांसाठी मोठा इशारा दिला आहे. 17 एप्रिलपासून नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असून, याचा परिणाम देशातील अनेक भागांवर होणार आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये अचानक हवामान बदलून जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः ईशान्य आणि दक्षिण भारतातील काही राज्यांना अवकाळीचा मोठा फटका बसू शकतो. अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड या ईशान्येकडील राज्यांसह केरला, तसेच अंदमान आणि निकोबार बेट येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मात्र दुसरीकडे महाराष्ट्र मध्ये चित्र वेगळंच आहे. राज्यात सध्या पावसाचा कोणताही ठोस अंदाज नसला तरी उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात तापमान आणखी वाढून उष्णतेचा कडाका जाणवणार आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे.
फक्त महाराष्ट्रच नाही, तर गुजरात, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांनाही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागांतील नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. Weather Alert
याचदरम्यान मान्सूनबाबतही एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मान्सून वेळेआधी भारतात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साधारणपणे जून महिन्यात मान्सूनची एन्ट्री होईल असा अंदाज आहे. मात्र यावेळी El Niño चा प्रभाव जाणवू शकतो, ज्यामुळे पावसाचे प्रमाण काही भागांत कमी राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एकूणच, पुढील काही दिवस देशासाठी हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कुठे मुसळधार पाऊस तर कुठे प्रचंड उष्णता या दोन्ही टोकाच्या परिस्थितींना नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे हवामान खात्याचे इशारे लक्षात घेऊनच पुढील नियोजन करणं गरजेचं आहे. काळजी घेतली, तरच या बदलत्या हवामानाचा सामना सहज करता येईल.
