Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आधीच वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसलेला असताना आता पुन्हा एकदा हवामानाने करवट घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची धास्ती वाढली आहे. पुढील दोन दिवस राज्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, २ ते ३ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा जोर वाढणार आहे. काही ठिकाणी ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांचा कडकडाट आणि गारपीटही होऊ शकते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांतील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे, मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मुंबईसह ठाणे आणि रायगड परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक भागात दुपारनंतर मेघगर्जना आणि वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येथे वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास इतका राहू शकतो. किनारपट्टी भागही या संकटातून सुटलेला नाही. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलका पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
या अवकाळी संकटाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. जालना जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत. जामवाडी गावातील शेतकरी विजय वाडेकर यांची परिस्थिती याचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी मोठ्या मेहनतीने उभारलेली आंब्याची बाग एका झटक्यात उद्ध्वस्त झाली. १० ते १२ टन उत्पादनाची अपेक्षा असताना आता फक्त १ ते २ टन आंबे शिल्लक राहण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडांवरील फळे मोठ्या प्रमाणात गळून पडली असून, उरलेली फळेही धोक्यात आहेत. यामुळे त्यांना सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.
ही केवळ एका शेतकऱ्याची कहाणी नाही, तर राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांची वेदना आहे. काही दिवसांपूर्वीच गारपिटीने आंबा, डाळिंब आणि द्राक्ष बागांचे मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा धुळीस मिळण्याची भीती आहे. Maharashtra Weather Update
हवामान खात्याने दिलेल्या सूचनांनुसार, विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडमध्ये उभे राहू नये. शेतकऱ्यांनी काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा आणि जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी. एकीकडे निसर्गाचा हा अनपेक्षित कहर, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात उरलेली आशा… येणारे दोन दिवस राज्यासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांच्या भविष्याचा निर्णय घेणारे ठरणार आहेत.
