Gold Silver Price Update: गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या बाजारात जे चित्र दिसत आहे, ते गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरत आहे. २०२६ च्या अर्थसंकल्पानंतर जिथे मौल्यवान धातूंनी विक्रमी उंची गाठली होती, तिथे आता त्याच वेगाने दर कोसळताना दिसत आहेत. सोमवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) सुरू होताच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण नोंदली गेली.
विशेष म्हणजे चांदीच्या दरात एका दिवसात तब्बल १६ हजार रुपयांची घसरण झाली, तर २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅममागे ४ हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाले. सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे बाजारात दबाव वाढलेला पाहायला मिळतो. Gold Silver Price Update
चांदीच्या दरात मोठा धक्का
गेल्या गुरुवारी पहिल्यांदाच चांदीने ४ लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला होता. मात्र हा आनंद फार काळ टिकला नाही. अर्थसंकल्पाच्या दिवशीच चांदीच्या किमतीत ९ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आणि त्यानंतरही घसरणीचा सिलसिला सुरूच राहिला. सोमवारी एमसीएक्सवर मागील व्यवहारात चांदी प्रति किलो २,६५,६५२ रुपयांवर बंद झाली होती. मात्र व्यवहार सुरू होताच ती २,५५,६५२ रुपयांवर आली आणि काही मिनिटांतच थेट २,४९,७१३ रुपयांपर्यंत घसरली. म्हणजेच अवघ्या काही वेळात प्रति किलो जवळपास १५,९४३ रुपयांची मोठी घसरण झाली.
अवघ्या काही दिवसांत १.७० लाखांची घसरण
चांदीच्या किमतीत वाढीचा वेग जितका झपाट्याने होता, त्याहून अधिक वेगाने आता घसरण होत आहे. गेल्या गुरुवारी ५ मार्चला एक्सपायर होणाऱ्या चांदीच्या फ्युचर्सने एमसीएक्सवर ४,२०,०४८ रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता. मात्र या उच्चांकावरून आता चांदी तब्बल १,७०,३३५ रुपयांनी स्वस्त झाली आहे. अचानक झालेल्या या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत.
सोन्याच्या दरातही मोठी पडझड
चांदीप्रमाणेच सोन्याच्या किमतींमध्येही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्याच्या दरात जवळपास १३ हजार रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर थोडी सुधारणा झाली असली, तरी सोमवारी पुन्हा एकदा दर कोसळले. रविवारी एमसीएक्सवर सोने प्रति १० ग्रॅम १,४७,७५३ रुपयांवर बंद झाले होते. मात्र सोमवारी व्यवहार सुरू होताच ते थेट १,४३,३२१ रुपयांपर्यंत खाली आले. यामुळे २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४,४३२ रुपयांची घसरण झाली.
सर्वकालीन उच्चांकापासून ४९ हजारांनी स्वस्त
गेल्या गुरुवारी सोन्यानेही विक्रमी कामगिरी करत १० ग्रॅममागे १,९३,०९६ रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र त्या पातळीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून, एकूण ४९,७७५ रुपयांची घसरण झाली आहे. उच्च दरात खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती मोठा तोटा ठरत आहे.
गुंतवणूकदारांसाठी पुढील दिशा काय?
जागतिक बाजारातील संकेत, डॉलरमधील चढ-उतार, व्याजदरावरील अनिश्चितता आणि अर्थसंकल्पातील धोरणात्मक बदल यांचा एकत्रित परिणाम सोने-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. सध्या बाजारात अस्थिरता असल्याने तज्ज्ञांकडून सावधगिरीचा सल्ला दिला जात आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी जे सोने-चांदी ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानली जात होती, तीच आता गुंतवणूकदारांच्या काळजीचे कारण बनली आहे. पुढील काही दिवसांत बाजाराची दिशा कोणती असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

