Weather Forecast: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पुणे, नाशिक, धुळे, जळगावसह मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह गारांचा मारा झाला. या अचानक बदललेल्या हवामानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वाधिक फटका बसला तो शेतकऱ्यांना. उभ्या पिकांचे नुकसान, फळबागांची हानी आणि काही ठिकाणी घरांचेही नुकसान झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यावरचे संकट अद्याप संपलेले नाही. पुढील पाच दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेष म्हणजे दुपारनंतर वातावरण ढगाळ होऊन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता दररोज राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांत ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख सुदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील वातावरण अस्थिर झाले आहे. याच कारणामुळे गारपीट, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे यांसह पावसाचा तडाखा वाढत आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. वादळी वाऱ्यांसह पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी आंब्याची जवळपास ५० टक्के फळे झाडांवरून गळून पडली आहेत. त्यामुळे हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पुढील पाच दिवसांसाठी या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा दिल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मोकळ्या जागेत उभे राहणे, झाडाखाली आसरा घेणे टाळावे, तसेच शेती कामे करताना सतर्कता बाळगावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
एकीकडे निसर्गाचा हा अवकाळी कहर आणि दुसरीकडे मेहनतीने उभा केलेला शेतमाल डोळ्यासमोर नष्ट होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. येणारे पुढील काही दिवस शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने कसोटीचे ठरणार आहेत. मात्र अशा संकटातही धीर न सोडता योग्य ती खबरदारी घेणे हेच सध्या सर्वांसाठी महत्त्वाचे ठरत आहे. Weather Forecast
