Tur Market | राज्यातील तूर बाजारात सध्या एक वेगळंच चित्र पाहायला मिळतंय सकाळी बाजारात पोहोचलेला शेतकरी दर विचारतो, तर कुठे 7 हजार, कुठे 7,500 तर काही ठिकाणी थेट 8 हजारच्या घरात दर मिळत असल्याचं ऐकायला मिळतं. पण या वाढलेल्या दरामागे एक वेगळीच गोष्ट दडलेली आहे आणि ती म्हणजे शेतकऱ्याच्या हातात आता तूरच उरलेली नाही. Tur Market
10 एप्रिलच्या बाजारभावाकडे नजर टाकली तर राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तूर दर चांगले वाढलेले दिसत आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात तूर दरात चांगलीच तेजी आली आहे. हिंगणघाट बाजारात तर कमाल दर थेट 8,700 रुपयांपर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. अकोला, नागपूर, अमरावती, जालना या बाजारांमध्येही 7,500 ते 8,000 दरम्यान व्यवहार होताना दिसत आहेत.
पण इथेच खरी गोष्ट सुरू होते कारण हे दर वाढले तेव्हा बहुतांश शेतकऱ्यांनी आपली तूर आधीच विकून टाकलेली आहे. गावातल्या अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, जेव्हा आमच्याकडे माल होता, तेव्हा भाव नव्हता आणि आता भाव आहे तर मालच नाही. त्यामुळे या वाढलेल्या दराचा थेट फायदा व्यापाऱ्यांना किंवा साठेबाजांना मिळत असल्याचं चित्र दिसतंय.
हे पण वाचा : राज्यात पुन्हा एकदा मोठा इशारा, या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आव्हान, तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का पहा
कारंजा बाजार समितीत तब्बल 3,325 क्विंटल आवक झाली असून सरासरी दर 7,450 रुपये आहे. लातूरमध्ये 3,500 पेक्षा जास्त क्विंटल आवक असून 7,400 च्या आसपास दर मिळतोय. नागपूरमध्ये 4,400 क्विंटलपेक्षा जास्त आवक असून सरासरी 7,500 च्या घरात व्यवहार झाले आहेत. या आकड्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते… बाजारात मागणी आहे, पण आवक कमी-जास्त होत असल्यामुळे दरात चढ-उतार सुरू आहेत.
यंदाच्या हंगामात तूर उत्पादनावरही मोठा परिणाम झाला होता. सुरुवातीला पावसाचा खंड, नंतर अचानक झालेला पाऊस, काही भागात किडरोग या सगळ्यामुळे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं. त्यामुळे बाजारात तूर कमी प्रमाणात उपलब्ध झाली आणि त्याचा थेट परिणाम दरावर दिसू लागला.
अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक गरजेमुळे तूर लवकर विकली. घरात खर्च, कर्ज फेडायचं, शेतीसाठी पैसे लागता त्यामुळे भाव कमी असतानाही माल विकावा लागतो. आणि नंतर जेव्हा भाव वाढतो, तेव्हा हातात काहीच राहत नाही. हीच परिस्थिती सध्या अनेक ठिकाणी दिसतेय.
पांढऱ्या तुरीच्या बाजारातही चांगले दर दिसत आहेत. जालना, औराद शहाजानी, माजलगाव या भागात 7,200 ते 7,800 दरम्यान व्यवहार झाले आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही 6,000 ते 7,000 दरम्यानच व्यवहार होत आहेत. म्हणजेच बाजार अजून पूर्ण स्थिर झालेला नाही.
हे पण वाचा : आजचे ज्वारी बाजार भाव : महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये ज्वारीला काय बाजार भाव मिळाला पहा
शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे थोडा माल ठेवला असता तर आज फायदा झाला असता. पण प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही. कारण साठवणुकीची सोय नसते, आर्थिक ताण असतो, आणि बाजाराचा अंदाज बांधणंही कठीण असतं. तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत तूर दर आणखी थोडे वाढू शकतात, कारण बाजारात आवक मर्यादित आहे आणि मागणी कायम आहे. पण हा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे.
एकंदरीत, तूर बाजारात सध्या तेजी आहे, आकडे चांगले दिसत आहेत पण या तेजीत शेतकरी मात्र मागेच राहतोय हीच खरी शेतकऱ्यांची वेदना आहे. भविष्यात अशा परिस्थितीपासून वाचायचं असेल तर साठवणूक, बाजाराचा अभ्यास आणि योग्य वेळेवर विक्री या तीन गोष्टींवर भर देणं आता गरजेचं ठरत आहे.
हे पण वाचा | आजचे तूर बाजारभाव 11 मार्च 2026 : महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर कसे राहिले?
