आजचा हवामान अंदाज | अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जे घडलं ते अजूनही शेतकऱ्यांच्या मनातून गेलेलं नाही… १७, १८ आणि १९ मार्च या तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने अक्षरशः शेती उद्ध्वस्त केली. काही ठिकाणी उभी पिकं आडवी झाली, तर काही ठिकाणी काढणीला आलेला माल पाण्यात भिजून गेला. आता थोडं बरं होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा आभाळ दाटून आलंय… कारण हवामान विभागाने आता सोमवारी ‘यलो अलर्ट Yellow alert आणि मंगळवारी पुन्हा पावसाचा इशारा दिलाय. आजचा हवामान अंदाज
गेल्या दोन दिवसांपासून (२० आणि २१ मार्च) थोडंसं कोरडं वातावरण होतं… शेतकरीही नुकसान झालेलं पीक सावरायला लागला होता. पण आता पुन्हा वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी पुन्हा एकदा धडकी भरवणारी ठरली आहे.
पाथर्डी, शेवगाव, पारनेर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा हे तालुके मागच्या वेळी अवकाळीच्या फटक्याने सर्वाधिक प्रभावित झाले होते. अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं, “हातात आलेलं पीक डोळ्यांसमोर गेलं… आणि आता पुन्हा त्याच परिस्थितीची भीती मनात आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर असा पाऊस पडणं म्हणजे पिकांसाठी मोठा धोका असतो. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा या पिकांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या नुकसानीचे आकडे पाहिले तर चित्र अजूनच गंभीर दिसतं. १७ आणि १८ मार्चला नगर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, अकोले, राहाता या भागातील ४१ गावांमध्ये तब्बल ७ हजार ३५२ शेतकऱ्यांच्या ३,५५८ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. त्यानंतर १९ मार्चला पारनेर, कर्जत, श्रीरामपूर, शेवगाव, संगमनेर या भागात पुन्हा अवकाळीने हजेरी लावली आणि १०३ गावांमधील सुमारे १२ हजार शेतकऱ्यांच्या ८ हजार हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला. म्हणजे एकूण मिळून जवळपास १९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकं या अवकाळीच्या तडाख्यात सापडली आहेत.
सध्या कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनामे सुरू आहेत… पण शेतकऱ्यांना प्रश्न आहे मदत कधी मिळणार? कारण नुकसान झालेलं पीक परत उभं राहणार नाही, आणि नवीन पेरणी करण्यासाठी वेळही हातातून निघून जात आहे.
आता पुन्हा येणाऱ्या दोन दिवसांचा अंदाज पाहता, शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर आधीच कमकुवत झालेली पिकं पूर्णपणे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असेल तेवढी काढणी लवकर पूर्ण करावी, कापलेला माल सुरक्षित ठेवावा आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच काम करावं, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
एकूणच, अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीचं संकट अजूनही संपलेलं नाही… आणि बळीराजा पुन्हा एकदा आभाळाकडे डोळे लावून बसलाय यावेळी तरी पाऊस टळेल का? अशीच आशा मनात ठेवून… कारण आता प्रत्येक थेंब पावसाचा त्याच्यासाठी धोक्याची घंटा बनला आहे.

2 thoughts on “राज्यात पुन्हा एकदा मोठ्या अवकाळी पावसाची शक्यता, या जिल्ह्यात मोठा इशारा”