Maharashtra Shetkari Karjmafi 2026 | माझ्या शेतकरी बांधवांनो, सध्या गावोगावी एकाच विषयाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सरकारने जाहीर केलेली २ लाख रुपयांची कर्जमाफी. पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच धाकधूक होती की, “भावा, माझं फक्त पीककर्ज माफ होणार की मी घेतलेल्या मध्यम मुदतीच्या कर्जाचं काय?” शेती करताना आपण कधी ट्रॅक्टरसाठी, कधी विहिरीसाठी तर कधी पाइपलाइनसाठी कर्ज घेतो. मग अशा कर्जाचा यात समावेश आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे.
काय आहे नेमकी अपडेट?
सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कर्जमाफी फक्त पीककर्जापुरती मर्यादित नसणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थकले आहे, त्यात पीककर्ज (Crop Loan) आणि मध्यम मुदतीचे कर्ज (Medium Term Loan) या दोन्हीचा समावेश असणार आहे. राज्यभरातील २४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांवर ३५ हजार कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी आहे. यात अशा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे ज्यांनी पीककर्ज तर वेळेवर भरलंय, पण त्यांचं मध्यम मुदतीचं कर्ज थकलंय. अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना या २ लाखांच्या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे.
३० जूनपूर्वी होणार कार्यवाही!
कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी स्पष्ट केलं आहे की, शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेता यावं आणि जुन्या कर्जाचा बोजा हलका व्हावा, यासाठी ३० जून २०२५ पूर्वी या कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल. सध्या बँकांकडून थकबाकीदारांची माहिती संकलित करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सोलापूर, पुणे, नाशिक, धाराशिव, लातूर आणि नांदेड यांसारख्या जिल्ह्यांमध्ये थकबाकीदारांची संख्या मोठी आहे, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाचे आकडे एका नजरेत:
एकूण थकबाकीदार शेतकरी: २४,७३,५६६
कर्जमाफीची मर्यादा: २ लाख रुपये
पात्रतेची तारीख: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतची थकबाकी
फायदा कधी मिळणार: ३० जूनपूर्वी
शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी निकषांनुसार पात्र असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना मिळणार आहे, त्यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. सध्या फक्त सरकारकडून अधिकृत निधी मंजूर होण्याची आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची वाट पाहायची आहे. ही महत्त्वाची माहिती आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही पाठवा जेणेकरून त्यांची चिंता मिटेल.
