Gomutra Business Profit | गायीच्या दुधाचा धंदा तर आपण वर्षानुवर्षे पाहिलाय, पण आता गोमूत्र विकूनही शेतकरी करोडपती होऊ शकतो, हे गुजरातच्या एका प्रयोगशील शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलंय. बनासकांठा जिल्ह्यातील देवाराम पुरोहित यांनी पारंपरिक वाटेपेक्षा वेगळी वाट चोखाळली आणि आज त्यांचं संपूर्ण कुटुंब १२-१३ शेकडो शेतकऱ्यांसाठी रोजगाराचा आधार बनलं आहे. त्यांच्या या ‘स्टार्टअप’ची चर्चा आता देशभर होत आहे.

५ रुपये लिटरने खरेदी आणि घरपोच सेवा!
देवाराम यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पात शेतकऱ्यांकडून ५ रुपये प्रतिलिटर दराने गोमूत्र खरेदी केलं जातं. विशेष म्हणजे, शेतकऱ्याला कुठेही जायची गरज नाही. त्यांच्या घरीच गोमूत्र जमा करण्यासाठी बॅरल ठेवला जातो आणि कंपनी स्वतः ते वाहनाद्वारे जमा करते. गेल्या वर्षभरात या माध्यमातून शेतकऱ्यांना तब्बल ९० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंतची रक्कम वाटण्यात आली आहे.
गोमूत्रातून बनवलं ‘शक्तीवर्धक’ खत!
कंपनीमध्ये गोमूत्रावर प्रक्रिया करून त्यातून ५० टक्के पाणी वेगळं केलं जातं. उरलेल्या ३० टक्के अमोनियम आणि २० टक्के पोटॅशमध्ये विविध औषधी झाडपाला मिसळून तीन खास उत्पादने तयार केली जातात:

१. सॉईल कंडिशनर: जे जमिनीला भुसभुशीत करतं आणि पिकांच्या मुळांची वाढ वेगाने करतं.
२. ग्रोथ लिक्विड: पिकांची पाने आणि फळांच्या वाढीसाठी हे वरदान ठरतंय.
३. पेस्ट रेम्पेलट: कीड नियंत्रणासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय.
मार्च २०२६ पर्यंत ३ कोटींची उलाढाल!
या स्टार्टअपचा आलेख इतका वेगाने उंचावला आहे की, मार्च २०२६ पर्यंत या कंपनीची वार्षिक उलाढाल ३ कोटींच्या घरात जाण्याची दाट शक्यता आहे. शेतीला केवळ जोडधंदा न मानता व्यावसायिक दृष्टीने पाहिलं तर काय चमत्कार घडू शकतो, हे देवाराम पुरोहित यांनी दाखवून दिलंय. आपल्या महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांसाठीही ही एक मोठी प्रेरणा आहे.
