Farmer loan waiver : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येतेय पण त्याच वेळी थोडी चिंता वाढवणारीही आहे. कारण यावेळी कर्जमाफी होणार असली तरी जुनी पद्धत नाही तर पूर्ण अभ्यास करून आणि कडक निकष लावूनच लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने ही बातमी नीट समजून घेणं खूप गरजेचं झालंय. सध्या सरकारकडून कर्जमाफीसाठी एक समिती काम करत आहे आणि पुढील महिन्यात या समितीचा अंतिम अहवाल शासनाकडे सादर होणार आहे. त्यानंतरच कोणाला कर्जमाफी मिळणार आणि कोणाला नाही, हे स्पष्ट होणार आहे. Farmer loan waiver
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme) जाहीर केली होती, तेव्हाच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आली होती. पण आता खरी अट इथेच आहे फक्त कर्ज थकीत आहे म्हणून माफी मिळणार नाही, तर त्या शेतकऱ्याची पूर्ण माहिती तपासूनच निर्णय घेतला जाणार आहे.
सध्या समिती वेगवेगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करत आहे. शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्या जमिनीवर नेमकं काय उत्पादन घेतलं जातं, त्या उत्पादनातून किती उत्पन्न मिळतं याची सगळी माहिती गोळा केली जात आहे. म्हणजेच आता खरंच गरजूंना मदत हा फोकस ठेवला जातोय. याशिवाय, आधीपासूनच केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचीही तपासणी होणार आहे. एकाच शेतकऱ्याला अनेक योजनांचा फायदा झाला आहे का, हे पाहिलं जाणार आहे.
विशेष म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरही यावेळी वेगळं लक्ष दिलं जात आहे. साखर कारखान्यांकडून त्यांना योग्य एफआरपी मिळते का, त्यांची आर्थिक स्थिती काय आहे, हे देखील तपासलं जात आहे. कारण काही शेतकरी नियमित उत्पन्न मिळवत असताना देखील कर्जमाफीचा लाभ घेतात, अशी तक्रार आधीपासून होती. त्यामुळे यावेळी सरकारने ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र दिसतंय.
गावातल्या शेतकऱ्यांच्या गप्पांमध्ये सध्या एकच चर्चा सुरू आहे आपल्याला कर्जमाफी मिळणार का? काहींना आशा आहे, तर काहींना भीती वाटतेय की कडक नियमांमुळे आपलं नाव यादीत येणार नाही. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी आधीच काही योजना घेतल्या आहेत किंवा थोडंफार उत्पन्न स्थिर आहे, त्यांच्यासाठी ही कर्जमाफी मिळणं अवघड होऊ शकतं.
एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे यावेळी कर्जमाफी सर्वांसाठी नाही, तर निवडक आणि पात्र शेतकऱ्यांसाठी असेल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कागदपत्रांची तयारी ठेवणं, स्वतःची आर्थिक स्थिती समजून घेणं आणि पुढील अपडेट्सवर लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण पुढील काही आठवड्यांतच या कर्जमाफीचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे. आणि तेव्हाच कळेल की कोणाच्या खात्यात दिलासा येणार आणि कोणाला अजून वाट पाहावी लागणार.
