Weather Alert : राज्यात मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता कुठे गारपीट, कुठे वादळी वारे तर कुठे अचानक आलेल्या पावसाने बळीराजाचा घास हिरावला पण आता हळूहळू हे संकट ओसरतान दिसतंय. मात्र जाता जाता अजूनही काही भागांना धक्का बसणार आहे, आणि त्यात सर्वात मोठी चिंता विदर्भात वाढलेली आहे.
आजचा दिवस पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण कोरडं होण्याकडे झुकतंय, पण चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये अजूनही धोका कायम आहे… हवामान खात्याने याठिकाणी यलो अलर्ट दिला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी आता पाऊस गेला असं समजून मोकळं श्वास घेतला होता, त्यांच्यासाठी अजूनही थोडी काळजी बाकी आहे.
गावाकडचं वास्तव सांगायचं झालं तर, अनेक ठिकाणी आधीच काढणीला आलेली पिकं उभी असताना पावसाने फटका दिला आणि आता शेवटच्या टप्प्यात पुन्हा पाऊस आला तर उरलेलं नुकसानही वाढू शकतं. त्यामुळे विदर्भातील शेतकरी अजूनही सावध आहेत
दरम्यान, उर्वरित महाराष्ट्रात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय. कोकण भागात उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागात उकाडा प्रचंड वाढणार अंगाला चिकटणारी उष्णता आणि दमट हवा यामुळे नागरिक त्रस्त होणार आहेत सकाळपासूनच घामाच्या धारा लागणार, अशी स्थिती निर्माण होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात दिवसभर कोरडं हवामान राहणार असलं तरी उष्णतेचा पारा वाढणार आहे. दुपारी उन्हाचा तडाखा इतका वाढेल की बाहेर काम करणं अवघड होईल. शेतात काम करणाऱ्या बळीराजाला आता उन्हाचा सामना करावा लागणार आहे.
मराठवाड्यात परिस्थिती आणखी गंभीर होताना दिसतेय छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड या भागात तापमान ४० अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच आता खरी उष्णतेची लाट सुरू होत आहे. कालपर्यंत पावसाने त्रास दिला, आता उन्हाने घाम काढायला सुरुवात केली आहे.
उत्तर महाराष्ट्रातही नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागात तापमानात वाढ होणार आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती दोन्ही बाजूंनी मारक ठरतेय. एकीकडे अवकाळी पावसाने नुकसान, तर दुसरीकडे लगेच वाढलेली उष्णता.
विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेची लाटसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागात तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच घराबाहेर पडताना काळजी घेणं गरजेचं आहे. उष्माघाताचा धोका वाढणार आहे.
एकूण चित्र पाहिलं तर राज्यावरचं पावसाचं संकट आता कमी होतंय. पण जाता जाता विदर्भातील काही भागांना अजूनही धक्का बसणार आहे. आणि त्यानंतर लगेच उष्णतेची लाट सुरू होणार आहे म्हणजेच बळीराजासाठी संकट संपलेलं नाही, फक्त त्याचा चेहरा बदलतोय.
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी उरलेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवणं, जनावरांची काळजी घेणं आणि दुपारच्या उन्हात काम टाळणं अत्यंत गरजेचं आहे. कारण एकीकडे पावसाचा शेवटचा झटका आणि दुसरीकडे उन्हाचा वाढता तडाखा. या दोन्हींच्या मध्ये सापडलेला बळीराजा सध्या खऱ्या अर्थाने संघर्ष करताना दिसतोय.
