Maharashtra Weather Forecast 03 April 2026 : सकाळी ऊन डोक्यावर तळपत असतं दुपारी अचानक आभाळ भरून येतं आणि संध्याकाळी वाऱ्याचा जोर वाढताच विजांचा कडकडाट सुरू होतो सध्या महाराष्ट्रात हवामानाने असा काही खेळ मांडलाय की शेतकरीच नाही तर सामान्य माणूसही संभ्रमात पडलाय.ऊन आहे की पाऊस येणार? हा प्रश्न रोजच पडतोय आणि आता तर हवामान खात्याने दिलेल्या नव्या इशाऱ्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कारण पुढील ३ ते ५ एप्रिल दरम्यान राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यातच वादळी वारे आणि गारपिटीचाही इशारा दिल्यामुळे बळीराजाच्या मनात भीतीचं सावट आणखी गडद झालं आहे. Maharashtra Weather Forecast 03 April 2026
यामागचं मुख्य कारण म्हणजे सध्या सक्रिय झालेला पश्चिमी विक्षोभ. हा विक्षोभ उत्तरेकडून भारताकडे सरकत असून त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर जाणवू लागलाय. अरबी समुद्राच्या उत्तरेकडून तयार झालेलं हे वातावरण सध्या हळूहळू अधिक तीव्र होत चाललं आहे. आणि त्यामुळेच पुढील काही दिवस वादळी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्येही या बदलाचा परिणाम दिसून येणार आहे. पण महाराष्ट्रासाठी हा काळ विशेषतः धोकादायक मानला जातोय.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र हे भाग सध्या या संकटाच्या केंद्रस्थानी आहेत… आधीच अवकाळी पावसामुळे त्रस्त असलेल्या या भागात आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे
३ ते ५ एप्रिलदरम्यान अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होऊ शकते. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग इतका वाढू शकतो की उभी पिकंही जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच हवामान विभागाने काही भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ तर काही भागांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
सध्या राज्यात जे चित्र आहे, ते खूपच वेगळं आहे… एका बाजूला कोकण पट्ट्यात तापमानात काहीशी घट झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी सुरू आहेत. काही भागात तर दिवसभर ऊन आणि संध्याकाळी पाऊस अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पिकांवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष यांसारखी पिकं काढणीच्या टप्प्यावर असताना हा पाऊस त्यांना मोठा फटका देतोय.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहिलं तर ही परिस्थिती खूपच गंभीर आहे. कारण एकीकडे त्यांनी वर्षभर कष्ट करून पिकं उभी केली, आणि आता जेव्हा उत्पन्न मिळण्याची वेळ आली, तेव्हाच निसर्गाचा हा फटका बसतोय. अनेक ठिकाणी गारपिटीमुळे पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे उभी पिकं आडवी झाली आहेत त्यामुळे हातात येणारा घास हिरावला अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
तापमानातही मोठे चढ-उतार दिसून येत आहेत. पुढील तीन दिवसांत राज्यातील काही भागात कमाल तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे… मात्र त्यानंतर पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे… म्हणजेच हवामान अजून काही दिवस स्थिर राहणार नाही, हे स्पष्ट झालं आहे…
या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सावध राहणं खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेली पिकं शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी हलवावीत. कांदा, द्राक्ष, भाजीपाला यांसारख्या पिकांना आच्छादन द्यावं. जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं. कारण विजांच्या कडकडाटामुळे आणि वाऱ्यामुळे त्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो.
नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणं टाळावं. वादळी वाऱ्याच्या वेळी झाडाखाली उभं राहू नये. विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत थांबणं टाळावं. कारण अशा वेळी अपघाताची शक्यता अधिक असते.
एकूणच पाहता प्रिल महिन्याची सुरुवातच महाराष्ट्रासाठी संकटाची ठरतेय. पावसाचा जोर वाढणार, वादळी वारे वाहणार आणि गारपीट होणार. या तिन्ही गोष्टी एकाच वेळी घडण्याची शक्यता असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे पुढील ३ ते ५ दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. शेतकरी, नागरिक आणि प्रशासन तिघांनीही सतर्क राहणं आवश्यक आहे कारण निसर्गाचा हा बदल कधी कोणत्या रूपात समोर येईल, हे सध्या तरी सांगणं कठीण झालं आहे. आणि म्हणूनच सध्या प्रत्येकजण आकाशाकडे पाहत आहे. आज काय होणार? या एका प्रश्नाचं उत्तर शोधत.
हे पण वाचा : गारपिटीचा कहर! या 7 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट; पुढील 24 तास शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे
