Maharashtra Weather Forecast : राज्यात सध्या हवामानाने अक्षरशः गोंधळ घातलाय… सकाळपासून ऊन अंग भाजतंय, तर दुपारनंतर अचानक ढग जमा होऊन वादळी पावसाची एन्ट्री होतेय. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही सतर्क झाले आहेत. हवामान विभागानेही स्पष्ट इशारा दिलाय पुढील २४ तास खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कुठेही निष्काळजीपणा चालणार नाही. Maharashtra Weather Forecast
रविवार २९ मार्चसाठी दिलेल्या अंदाजानुसार राज्यात एकाच वेळी दोन वेगवेगळं चित्र पाहायला मिळतंय. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडक उन्हाचा तडाखा कायम राहणार आहे, तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजेच एका बाजूला उकाडा, तर दुसऱ्या बाजूला पावसाचं सावट अशी दुहेरी परिस्थिती सध्या राज्यात तयार झाली आहे.
कोकण भागात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान नागरिकांना हैराण करत आहे. तापमान ३३ ते ३५ अंशांदरम्यान असलं तरी दमटपणामुळे त्याचा त्रास जास्त जाणवतोय. घामानं अंग ओलं होतंय, बाहेर पडायलाही जीव जातोय… अशी अवस्था लोकांची झाली आहे.
पण पश्चिम महाराष्ट्रात चित्र थोडं वेगळं आहे. पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर हवामान अचानक बदलू शकतं. ढग दाटून येतात, वाऱ्याचा वेग वाढतो आणि काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. विशेषतः सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी जास्तच चिंतेत आहेत, कारण काढणीला आलेल्या पिकांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो.
उत्तर महाराष्ट्रात मात्र उष्णतेचा जोर कायम राहणार आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात पारा ३४ ते ३६ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पावसाची शक्यता कमी असली तरी उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारी बाहेर पडणं म्हणजे अंगावर जाळ ओढल्यासारखं वाटतंय.
मराठवाड्यात परिस्थिती आणखी तणावपूर्ण आहे. छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, बीड, धाराशिव या भागात उष्णतेची लाट कायम आहे, पण त्याचवेळी काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिवसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. म्हणजेच कधी ऊन, कधी पाऊस अशा बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
विदर्भात तर उन्हाने कळस गाठलाय. नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तापमान ३८ ते ४१ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. अंगातून घामाच्या धाराच निघत आहेत. या उष्णतेत काम करणंही अवघड झालंय.
या सगळ्या परिस्थितीत हवामान विभागाने दिलेला इशारा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे विजांचा कडकडाट, झाडं पडणे, वीजपुरवठा खंडित होणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो दुपारनंतर अनावश्यक बाहेर पडणं टाळावं, उघड्यावर थांबू नये आणि सुरक्षित ठिकाणी राहावं, असा सल्ला दिला जातोय.
शेतकऱ्यांसाठीही हा काळ खूपच महत्त्वाचा आहे. काढणीला आलेली पिकं शक्य तितक्या लवकर काढून सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. शेतात पाणी साचू नये यासाठी निचरा व्यवस्था करावी लागेल. जनावरांना सुरक्षित जागी बांधणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण एका पावसाने महिन्यांचा मेहनत वाया जाऊ शकते.
एकंदरीत राज्यात सध्या हवामानाचा खेळ सुरू आहे. कधी ऊन, कधी पाऊस यामुळे सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकजण चिंतेत आहे. पुढील २४ तास निर्णायक ठरणार आहेत, त्यामुळे सावध राहणं आणि परिस्थितीनुसार तयारी ठेवणं हाच सध्या एकमेव पर्याय आहे.
हे पण वाचा : राज्यात पुन्हा एकदा मोठ्या अवकाळी पावसाची शक्यता, या जिल्ह्यात मोठा इशारा
